
लातूर, 15 जुलै (हिं.स.)।
* ७ हजारांहून अधिक महिलांना कौशल्याचे बळ; आता प्रभाग ८ मध्ये मोफत शिलाई प्रशिक्षण
* महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प; लातूरमध्ये १६ वे मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्र सुरू
महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ८ येथे मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र क्रमांक १६ चे उद्घाटन ट्वेंटी वन अॅग्रो लिमिटेडच्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विलासराव देशमुख फाउंडेशन सातत्याने विविध कौशल्य विकास उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या या प्रशिक्षण केंद्रात महिलांना शिलाई मशीनचे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना स्वयंरोजगाराच्या विविध संधींबाबत आवश्यक मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, कौशल्य आत्मसात करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे आणि कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावावा, या उद्देशाने फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
विलासराव देशमुख फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत ७ हजारांहून अधिक महिलांना शिलाई मशीन, ब्युटी पार्लर, स्पोकन इंग्लिश, रिटेल सेल्स, बेडसाइड असिस्टंट, केक मेकिंग यांसह विविध कौशल्याधारित प्रशिक्षणांचा लाभ मिळाला आहे. या प्रशिक्षणांमुळे अनेक महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.
यासोबतच महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘व्ही.डी.एफ. बाजार’ हा उपक्रमही राबविण्यात येत आहे. या माध्यमातून महिला उद्योजक आणि बचतगटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या उद्घाटन कार्यक्रमास उपमहापौर ॲड. स्नेहल श्रीकांत उटगे, लोकप्रतिनिधी, विलासराव देशमुख फाउंडेशनचे पदाधिकारी, बचतगटांच्या सदस्य, प्रशिक्षणार्थी महिला तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis