लातूरमध्ये ‘बूथ तेथे शाखा’चा विस्तार; शेतकरी, बचत गट अन् लघुउद्योजकांना संधी
लातूर, 15 जुलै (हिं.स.)।लातूर शहरासह जिल्हाभरातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच दैनंदिन जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याबरोबरच स्थानिक स्तरावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘बूथ तेथे शाखा’ हा उपक्रम राबविण्यात येत
दूध तेथे शाखा


लातूर, 15 जुलै (हिं.स.)।लातूर शहरासह जिल्हाभरातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच दैनंदिन जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याबरोबरच स्थानिक स्तरावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘बूथ तेथे शाखा’ हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती श्री स्वामी समर्थ ट्रेडिंग कंपनी उद्योग समूहाच्या वतीने देण्यात आली आहे.

या उपक्रमांतर्गत लातूर शहरातील १८ प्रभागांमध्ये तसेच विविध बूथ परिसरात शाखांचे जाळे उभारण्याची विस्तार मोहीम हाती घेण्यात आली आहे. या शाखांच्या माध्यमातून नागरिकांना भाजीपाला, फळे, धान्य, किराणा, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मसाले, कपडे, भांडी, फुले यांसह विविध दैनंदिन वापराच्या वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा दावा संस्थेने केला आहे.

नागरिकांना त्यांच्या परिसरातील शाखांची माहिती डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून दिली जात असल्याचेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांना आवश्यक वस्तूंसाठी दूरवर जाण्याची गरज कमी होऊन त्यांच्या घराजवळच विविध वस्तू उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.

स्थानिक उत्पादकांना थेट बाजारपेठ

या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, दूध उत्पादक, लघुउद्योजक आणि स्थानिक उत्पादक यांच्या उत्पादनांना शहरात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. स्थानिक स्तरावर उत्पादित होणाऱ्या वस्तूंना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाल्यास उत्पादकांना फायदा होण्यासोबतच स्थानिक व्यापारालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

विशेषतः महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने, शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळे, दूध उत्पादकांची उत्पादने तसेच लघुउद्योजकांच्या विविध वस्तूंना या शाखांच्या माध्यमातून विक्रीची संधी उपलब्ध होऊ शकणार असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी

‘बूथ तेथे शाखा’ या उपक्रमामुळे केवळ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होणार नसून, स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचाही उद्देश असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. शाखांच्या विस्तारामुळे स्थानिक स्तरावर व्यवसायाच्या संधी वाढून आर्थिक उलाढालीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

गाव, वाडी-वस्तीपर्यंत विस्ताराची योजना

लातूर शहरापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील विविध तालुके, गावे, वाड्या आणि वस्त्यांपर्यंत त्याचा विस्तार करण्याची योजना असल्याचे संस्थेने नमूद केले आहे. नागरिकांना त्यांच्या परिसरातच आवश्यक वस्तू उपलब्ध करून देणे आणि स्थानिक उत्पादकांना ग्राहकांशी जोडणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा तसेच उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी ९९२१४८८३३८, ९३७३८२१३६३ आणि ९७६४७९९९०९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande