नागपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी १०० कोटींच्या प्रकल्पास शासनाची मंजुरी
- आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध होणार - महसूलमंत्री बावनकुळे यांच्या पाठपुराव्याला यश नागपूर, 15 जुलै (हिं.स.) - नागपूर जिल्हा क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी १०० कोटींच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क
नागपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी १०० कोटींच्या प्रकल्पास शासनाची मंजुरी


- आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध होणार

- महसूलमंत्री बावनकुळे यांच्या पाठपुराव्याला यश

नागपूर, 15 जुलै (हिं.स.) - नागपूर जिल्हा क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी १०० कोटींच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, या प्रकल्पामुळे नागपूरमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध होणार आहेत

नागपूरच्या क्रीडा विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

नागपूर जिल्हा क्रीडा संकुल हे आधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय निकषांनुसार विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये ३०० मुलांसाठी व ३०० मुलींसाठी स्वतंत्र सुसज्ज वसतिगृहे, बहुउद्देशीय इनडोअर हॉल, २० मीटर व ५० मीटर शूटिंग रेंज, ४०० मीटर सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅक, हॉकीसाठी अॅस्ट्रोटर्फ मैदान, सिंथेटिक बास्केटबॉल कोर्ट, ७० मीटर आर्चरी रेंज, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल मैदाने, मिनी गोल्फ सुविधा, आधुनिक व्यायामशाळा, सौर ऊर्जा प्रकल्प, चेंजिंग रूम, पाणीपुरवठा व्यवस्था आणि इतर अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत.

या प्रकल्पाला २० मे २०२६ रोजी उच्चस्तरीय सचिव समितीची मंजुरी मिळाल्यानंतर २५ जून २०२६ रोजी राज्य मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली होती. त्यानंतर आता शासनाने प्रशासकीय मान्यता दिल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पासाठी लागणारा संपूर्ण निधी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शासनाने प्रकल्पातील विशेष तांत्रिक कामांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी मुख्य कंत्राटदाराने अनुभवी क्रीडा क्षेत्रातील कंत्राटदारासोबत संयुक्त उपक्रम (जॉइंट व्हेंचर) करूनच निविदा सादर करणे आवश्यक केले आहे. त्यामुळे प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जानुसार उभारला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नागपूरच्या क्रीडा विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर झाल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले. नागपूरची ओळख आधुनिक क्रीडा सुविधांनी सज्ज असलेल्या देशातील प्रमुख क्रीडा केंद्रांपैकी एक म्हणून अधिक मजबूत होण्यास या प्रकल्पाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. विदर्भातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय ऐतिहासिक असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.

चौकट

नागपूरमध्ये आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा उभारण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील होतकरू खेळाडूंना त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रशिक्षण, निवासी सुविधा आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक वातावरण मिळेल. या प्रकल्पामुळे नागपूरमध्ये राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे अधिक सुलभ होणार असून, विदर्भातील हजारो खेळाडूंना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.

चंद्रशेखर बावनकुळे

महसूलमंत्री

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande