
रत्नागिरी, 15 जुलै (हिं.स.) । वाढती महागाई विचारात घेऊन येत्या १ सप्टेंबरपासून ग्रामीण व शहरी भागातील केशकर्तनाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय संगमेश्वर तालुका नाभिक समाज संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. संगमेश्वर तालुका नाभिक समाज संघाची मासिक सर्वसाधारण सभा संत सेना नगरमधील श्री संत सेना महाराज समाज मंदिरात पार पडली. संघाचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत समाजाच्या विविध प्रश्नांवर आणि आगामी उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
स्वराज्यरक्षक नरवीर शिवा काशीद यांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. सल्लागार राजेंद्र कदम यांनी शिवा काशीद यांचे बलिदान समाजबांधवासाठी कसे प्रेरणादायी आहे, यावर आपले विचार मांडले. सभेत आगामी ८ सप्टेंबर २०२६ रोजी साजरा होणाऱ्या श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. यासोबतच तालुक्यातील सलून व्यवसायातील अडीअडचणींवरही चर्चा झाली. केशकर्तनाच्या दरात वाढ करतानाच ग्राहकांना उत्तमात उत्तम सेवा देण्याचे आवाहन अध्यक्ष अभिजित चव्हाण आणि उपाध्यक्ष सागर चव्हाण यांनी यावेळी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी