नागपूर : रुई येथे निःशुल्क मल्टीस्पेशालिटी आरोग्य शिबिराचे आयोजन
तब्बल 207 ग्रामीणांनी घेतला आरोग्य सेवांचा लाभ नागपूर, 15 जुलै (हिं.स.) : निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपूर आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर व्हिजन (आरसीएनव्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्यातील रुई गावात मोफत मल्टीस्पेशालिटी आरोग्य तपासणी
नागपूरच्या रूई गावातील आरोग्य शिबिराचे छायाचित्र


तब्बल 207 ग्रामीणांनी घेतला आरोग्य सेवांचा लाभ

नागपूर, 15 जुलै (हिं.स.) : निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपूर आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर व्हिजन (आरसीएनव्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्यातील रुई गावात मोफत मल्टीस्पेशालिटी आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये 207 ग्रामीण नागरिकांनी विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी, उपचार तसेच आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा सहज उपलब्ध होणे आजही एक मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत या शिबिरामुळे नागरिकांना त्यांच्या गावाजवळच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामुळे त्यांचा वेळ, प्रवासाचा त्रास आणि उपचारासाठी होणारा अनावश्यक खर्च कमी झाला. अनेक रुग्णांनी प्रथमच तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेतला आणि आपल्या आजाराची योग्य माहिती मिळवली. त्यामुळे त्यांच्या मनात उपचाराबाबत नवीन विश्वास आणि आशा निर्माण झाली. या शिबिरात हृदयरोग (कार्डिओलॉजी), जनरल मेडिसिन, स्त्रीरोग, शस्त्रक्रिया, अस्थिरोग, दंतचिकित्सा, ईएनटी (नाक-कान-घसा), फिजिओथेरपी तसेच सामान्य वैद्यकीय सेवा अशा विविध तज्ज्ञ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. ग्रामीण नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत हा अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा आरोग्य विभाग, नागपूर यांचे विशेष सहकार्य लाभले. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र, बोरखेडी, खापरी उपकेंद्र तसेच परिसरातील आरोग्य केंद्रांच्या पथकांनी सक्रिय सहभाग नोंदवत ग्रामीण नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

शिबिरासाठी ग्रामपंचायत रुई यांनी जागा उपलब्ध करून देण्यासह आवश्यक ते सर्व सहकार्य केले. तसेच आशा कार्यकर्त्या, एएनएम, आरोग्य कर्मचारी आणि निरामय संस्थेच्या ग्राम स्वयंसेवकांनी घरोघरी संपर्क साधून अधिकाधिक ग्रामीण नागरिकांना शिबिराचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.हे शिबिर निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर व्हिजन (आरसीएनव्ही) यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीपणे पार पडले.

तज्ज्ञ डॉक्टरांचे अमूल्य सहकार्य

श्युअरटेक हॉस्पिटल, शालिनीताई मेघे हॉस्पिटल, वानाडोंगरी, स्वर्गीय दादासाहेब कालमेघ स्मृती डेंटल कॉलेज व हॉस्पिटल, नागपूर, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (NCI) तसेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज (जीएमसी), नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टर, पीजी डॉक्टर, इंटर्न्स आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपली अमूल्य सेवा देत हे शिबिर यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.

रोटरी क्लब ऑफ नागपूर व्हिजनचे स्वयंसेवक, निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेची संपूर्ण टीम, ग्रामपंचायत रुई, जिल्हा आरोग्य विभाग, आशा कार्यकर्त्या, आरोग्य कर्मचारी तसेच ग्राम स्वयंसेवक यांच्या सामूहिक प्रयत्न, सेवाभाव आणि समर्पणामुळे हे आरोग्य शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande