एसआयआर अभियानात जालना जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी; उत्कृष्ट बीएलओंचा गौरव
छत्रपती संभाजीनगर, 15 जुलै (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण अभियानांतर्गत सन 2002 पूर्वीच्या मतदार यादीतील मतदारांची नावे सध्याच्या मतदार यादीशी मॅपिंग करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून,
Q


छत्रपती संभाजीनगर, 15 जुलै (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण अभियानांतर्गत सन 2002 पूर्वीच्या मतदार यादीतील मतदारांची नावे सध्याच्या मतदार यादीशी मॅपिंग करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, जालना जिल्ह्याने या अभियानात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व त्यांच्या पथकांचा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

भारत निवडणूक आयोगाच्या तिसऱ्या टप्प्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार महाराष्ट्रासह 16 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरभेटी देऊन मतदारांना गणना प्रपत्र वाटप, अर्ज भरण्यास सहाय्य आणि डिजिटायझेशनची प्रक्रिया राबवत आहेत.जालना जिल्ह्यात एकूण 16 लाख 82 हजार 723 मतदार असून, आतापर्यंत 13 लाख 54 हजार 924 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. त्याची टक्केवारी 80.52 इतकी आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय कामगिरीमध्ये 99-परतूर मतदारसंघात 3 लाख 30 हजार 377 मतदारांपैकी 2 लाख 87 हजार 310 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, त्याची टक्केवारी 86.96 आहे. 100-घनसावंगी मतदारसंघात 3 लाख 28 हजार 606 मतदारांपैकी 2 लाख 99 हजार 535 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, त्याची टक्केवारी 91.15 आहे.

101-जालना विधानसभा मतदारसंघात 3 लाख 58 हजार 637 मतदारांपैकी 2 लाख 3 हजार 398 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, त्याची टक्केवारी 56.71 आहे. 102-बदनापूर मतदारसंघात 3 लाख 38 हजार 936 मतदारांपैकी 2 लाख 86 हजार 409 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, त्याची टक्केवारी 84.50 आहे. तर 103-भोकरदन मतदारसंघात 3 लाख 26 हजार 167 मतदारांपैकी 2 लाख 78 हजार 272 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, त्याची टक्केवारी 85.32 आहे.

या अभियानासाठी 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार मॅपिंगचे काम प्रभावीपणे पूर्ण करणाऱ्या बीएलओंचा सत्कार करण्यात आला. परतूर, घनसावंगी, जालना, बदनापूर आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंना यावेळी गौरविण्यात आले.

सत्कारमूर्तींमध्ये शरद मुंढे, सुनील गवई, कालिंदा दवंडे, श्रीराम बहीर, मुकेश गाडेकर, बी. आर. वाघमारे, रमेश मान्टे, श्रीमती शिवगंगा बारगाजे, दीपक मोहिते, शिवाजी ठाकूर आणि ए. पी. इंगळे या बीएलओंचा समावेश आहे.

मतदार यादी अद्ययावत, अचूक आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने विशेष सखोल पुनरीक्षण अभियान महत्त्वपूर्ण असून, नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande