
परभणी, 15 जुलै, (हिं.स.)। ओडिसा येथील जगप्रसिध्द पुरी जगन्नाथ रथयात्रेच्या धर्तीवर दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी परभणीत आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत (इस्कॉन) तर्फे गुरुवार 16 जूलै रोजी दुपारी 2 वाजता मध्यवस्तीतील शनिवार बाजार मैदानातून भगवान श्री जगन्नाथाची भव्य रथयात्रा निघणार आहे.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी या रथयात्रेच्या भव्य सोहळ्याच्या निमित्ताने इस्कॉनतर्फे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
विशेषतः गुरुवारी दुपारी 2 वाजता शनिवार बाजार मैदानावर भगवान श्री जगन्नाथ बंधु बलभद्र आणि भगिणी सुभद्रा यांच्या विधी ग्रहांची विधीवत महापूजा आणि आरती करुन या रथयात्रेस प्रारंभ होणार आहे. सजवलेल्या भव्य रथातून भगवान जगन्नाथ नगर प्रदर्शनेकरीता मार्गस्थ होणार आहेत. या रथयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या रथयात्रेमध्ये पारंपारिक वाद्य, टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि विविध भजनी मंडळांचा सहभाग असणार आहे. शनिवार बाजार मैदानावरुन सुरु होणारी ही रथयात्रा मध्यवस्तीतील प्रमुख मार्गावरुन मार्गक्रमण करणार आहे. या रथयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी भगवान जगन्नाथाच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या काढण्यात येणार असून सुवासिक फुलांची उधळणही होणार आहे.
दरम्यान, जगन्नाथ भक्तांनी मोठ्या संख्येने या रथयात्रेच्या महोत्सवात सहभागी व्हावे, तसेच दर्शनाचा आणि महाप्रसादाचाही लाभ घ्यावा, असे आवाहन श्री जगन्नाथ रथ उत्सव समितीचे मनोहर माधवदास यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis