
अमरावती, 15 जुलै (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान शहरातील स्वच्छता व्यवस्थेच्या मुद्द्यावर मोठा राजकीय गदारोळ झाला. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर कचरा टाकून अनोखे आणि आक्रमक आंदोलन करत 'कोणार्क' कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली. या घटनेमुळे महापालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
एमआयएमचे माजी प्रदेश महासचिव व माजी गटनेते अब्दुल नाझीम यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते महापालिका मुख्यालयात दाखल झाले. आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासन आणि शहरातील कचरा संकलनाचे कंत्राट असलेल्या कोणार्क कंपनीवर संगनमत व निष्काळजीपणाचा आरोप केला.
अब्दुल नाझीम यांनी आरोप केला की, शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून विशेषतः पश्चिम भागातील स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. संबंधित कंपनीने समाधानकारक काम न करता नियम धाब्यावर बसवत तिची सुमारे ५० टक्के बिले अदा करण्यात आली, हा महापालिकेच्या निधीचा अपव्यय आणि भ्रष्टाचाराचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रवेशद्वारावर पोलिसांनी अडवल्यानंतर एमआयएमचे कार्यकर्ते रस्त्यावरच ठिय्या आंदोलनाला बसले. यावेळी महापौर होशात या अशा घोषणा देत त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनकर्त्यांनी कोणार्क कंपनीला तातडीने ब्लॅकलिस्ट करावे आणि बिल देयक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या आंदोलनामुळे महापालिका मुख्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या प्रकरणावर महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी