
जळगाव, 15 जुलै (हिं.स.) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र (मधमाशापालन) योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा तसेच मधमाशा संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येते. वैयक्तिक मधपाळासाठी अर्जदार साक्षर असावा. स्वतःची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे तसेच १० दिवसांचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. केंद्रचालक प्रगतिशील मधपाळ व्यक्तीसाठी किमान दहावी उत्तीर्ण व वय २१ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्तीच्या अथवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेतजमीन किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली शेतजमीन असावी. मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्थेसाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडेतत्त्वावर घेतलेली किमान एक हजार चौरस फूट सुयोग्य इमारत तसेच एक एकर शेतजमीन स्वमालकीची किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली असावी. संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवा असावीत. विशेष छंद प्रशिक्षणासाठी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, नोकरदार, सेवानिवृत्त कर्मचारी, वयोवृद्ध तसेच कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते.
प्रशिक्षण घेणे बंधनकारक असून २५ रुपये प्रवेश शुल्क भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, सदगुरू एज्युकेशन सोसायटी, खॉजामियाँ दर्गा चौक, कन्या शाळेसमोर, जळगाव येथे अथवा मोबाईल क्रमांक ९५४५५११९७९ / ९४२२९८२६२१ वर संपर्क साधावा. तसेच या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जगदीश पाटील यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर