
बीड, 15 जुलै (हिं.स.)।
बीड पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून दुचाकी चोरी करून त्या पुणे, मुंबईसह विविध शहरांमध्ये विक्री करणाऱ्या या आरोपींकडून तब्बल 29 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
बीड पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत मोठी कारवाई केली आहे. वैभव खेडकर आणि गणेश बहिर या दोन अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी रंगेहात अटक केली. हे दोघे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून दुचाकी चोरी करून त्या पुणे, मुंबईसह इतर शहरांमध्ये विकत असल्याचे तपासात समोर आले आहे.
या आरोपींनी बीडसह अहिल्यानगर, पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतूनही दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून एकूण 29 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्यांची अंदाजे किंमत 14 लाख 90 हजार रुपये आहे.
सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांनी आणखी कोणत्या जिल्ह्यांत अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत, याचा तपास बीड पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis