
रत्नागिरी, 15 जुलै (हिं.स.) । राजापूर नगरपालिकेच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राजापूर पालिकेतर्फे येत्या १५ ऑगस्ट रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि क्रीडाविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही मॅरेथॉन स्पर्धा राजापूर शहरातील जवाहर चौक ते शीळ पावस्कर घर या मार्गावर होणार आहे. पुरुष गटासाठी ५ किलोमीटर, महिला गटासाठी ३ किलोमीटर, तर १४ वर्षांखालील मुलामुलींसाठी १ किलोमीटर धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पुरुष गटातील विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. महिला विजेत्यांसाठी अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपये, तर १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटातही प्रथम ३ हजार, द्वितीय २ हजार आणि तृतीय १ हजार रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
स्पर्धेची माहिती नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपनगराध्यक्ष विनय गुरव, पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे, शिवसेना गटनेते ॲड. राहुल तांबे यांच्यासह नगर परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी १ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन (गुगल फॉर्मद्वारे) अथवा ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी