
मुंबई, 15 जुलै (हिं.स.)। मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोडच्या बोगद्यात बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. बोगद्यातून वेगाने धावणाऱ्या एका कारला अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. कारने पेट घेतल्यानंतर बोगद्यात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. या घटनेमुळे कोस्टल रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोस्टल रोडच्या बोगद्याच्या सुरुवातीच्या भागात ही घटना घडली. एका कारला अचानक आग लागल्यानंतर मागून येणाऱ्या वाहनांना काही अंतरावर थांबवण्यात आले. मात्र, त्याचवेळी बोगद्यात वाहनांची मोठी रांग लागली आणि अनेक गाड्या एकामागोमाग अडकून पडल्या.
बोगद्यात धूर वाढत असल्याने अनेक प्रवासी घाबरले. काही जण आपली वाहने रस्त्यातच सोडून बाहेर पडले आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू लागले. अनेक प्रवाशांनी घटनास्थळाचे व्हिडीओ बनवून परिस्थितीची माहिती दिली. बोगद्यात मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिस, वाहतूक विभागाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून अडकलेल्या वाहनचालकांना मार्गदर्शन केले. काही वेळाने वाहनांना मागे घेऊन बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि हळूहळू वाहतूक सुरळीत करण्यात आली.
अडकलेल्या एका प्रवाशाने व्हिडीओद्वारे मदतीचे आवाहन केले होते. “कोस्टल रोडच्या बोगद्यात एका गाडीला आग लागली आहे. सर्व गाड्या आतमध्ये अडकल्या आहेत. धूर मोठ्या प्रमाणात पसरला असून आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढावे,” अशी मागणी त्याने केली होती.
मुंबईतील वरळी ते मरीन लाईन्सदरम्यानचा हा सुमारे ११ किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड शहरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग मानला जातो. या घटनेमुळे काही काळ वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. प्रशासनाने तातडीने कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या घटनेमुळे बोगद्यातील आपत्कालीन सुरक्षा यंत्रणेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule