
धाराशिव, 15 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश,कर्नाटक, तेलंगणा आणि इतर राज्यांतील भाविक मोठ्या संख्येने तुळजापूर येथे येत असतात.कुलदेवतेचे दर्शन, कुलाचार आणि कुलधर्म पार पाडण्यासाठी भाविकांची वर्षभर मोठी गर्दी होत असते.या पार्श्वभूमीवर ऑगस्ट २०२६ महिन्यातील श्री तुळजाभवानी देवींच्या सिंहासन पूजेसाठी ऑनलाइन नोंदणीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, भाविकांनी त्यानुसार नोंदणी करावी, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने केले आहे.
श्री देवींची सिंहासन पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.या पूजेची नोंदणी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर https://online.shrituljabhavani.org या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाविक,महंत,पुजारी,सेवेकरी तसेच नागरिकांनी याची नोंद घ्यावी,असेही संस्थानतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
ऑगस्ट २०२६ महिन्यातील सिंहासन पूजेसाठी ऑनलाइन नोंदणी १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असून २४ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत.भाविकांनी अधिकृत संकेतस्थळावर प्रवेश करून आपली नोंदणी पूर्ण करावी. यानंतर २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन ड्रॉ पद्धतीने प्रथम सोडत काढण्यात येईल.निवड झालेल्या भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस पाठविण्यात येतील. प्रथम सोडतीतील भाविकांनी २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजतापासून ते २८ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत ऑनलाइन शुल्क भरावे.
प्रथम फेरीत सिंहासनांची संख्या पूर्ण न झाल्यास २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत द्वितीय ऑनलाइन सोडत काढण्यात येईल. निवड झालेल्या भाविकांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात येईल.द्वितीय सोडतीतील भाविकांनी २८ जुलै रोजी सकाळी ११ ते २९ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत ऑनलाइन पेमेंट करावे. प्रथम आणि द्वितीय फेरीतही सिंहासनांची संख्या पूर्ण न झाल्यास तृतीय ऑनलाइन सोडत काढण्यात येईल.या सोडतीसाठी २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत भाविकांना एसएमएस पाठविण्यात येतील. तृतीय सोडतीतील भाविकांनी २९ जुलै रोजी सकाळी ११ ते ३० जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत ऑनलाइन पेमेंट करावे.
ऑगस्ट २०२६ महिन्यातील सिंहासन पूजेचे अंतिम बुकिंग पूर्ण झालेल्या भाविकांची यादी ३० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भाविकांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून सिंहासन पूजेचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूरचे व्यवस्थापक (प्रशासन) यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis