
यवतमाळ, 15 जुलै (हिं.स.)। जिल्ह्यात जुलैचा अर्धा महिना उलटत असतानाही पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून एकही समाधानकारक सरी न बरसल्याने खरीप पिकांवर संकटाचे ढग दाटले आहेत. भर पावसाळ्यात उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी चिंतेत आहेत. १ जून ते १४ जुलैदरम्यान हंगामाच्या सरासरीपैकी अवघ्या २८.१ टक्केच पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेतही यंदा २.१ मिमीने कमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.
जुलै महिन्यात पावसाने सातत्य राखणे अपेक्षित असताना यंदा जिल्ह्यातील बहुतांश भाग कोरडाच आहे. समुद्राकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने ढगांची निर्मिती होत नाही. कमाल तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या कडक ऊन पडत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, १ जून ते १४ जुलै या कालावधीत जिल्ह्यात २१३.६ मिमी पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात २२६.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तो या कालावधीच्या सरासरीच्या १०५.९ टक्के आहे. मात्र, जून ते सप्टेंबर या संपूर्ण हंगामाच्या सरासरीच्या तुलनेत आतापर्यंतचा पाऊस केवळ २८.१ टक्के इतकाच आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात २२८.२ मिमी पाऊस झाला होता. तो त्या वेळच्या सरासरीच्या १०६.८ टक्के होता. यंदा त्याच्या तुलनेत २.१ मिमीने कमी पाऊस झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने पेरणीनंतर उगवलेल्या सोयाबीन, तूर, कापूस, इतर खरीप पिकांवर ताण निर्माण झाला आहे. आता शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा एकदा दमदार पावसाकडे लागल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने खरीप पिकांवर ओलाव्याचा ताण वाढू लागला आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लवकरच दमदार पाऊस झाला नाही, तर उगवलेली पिके करपण्याची शक्यता आहे. अनेक भागांत दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत ८४ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील ८ लाख ९९ हजार ९४७ हेक्टर क्षेत्रापैकी ७ लाख ६० हजार ३३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आर्णी तालुक्यात सर्वाधिक १०० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. पांढरकवडा (९४%), पुसद (९३%), घाटंजी (९२%), बाभूळगाव व नेर (प्रत्येकी ९०%) तालुक्यांमध्येही पेरणी अंतिम टप्प्यात आहे. दुसरीकडे राळेगावमध्ये सर्वात कमी ७१ टक्के पेरणीची नोंद झाली आहे. दारव्हा, दिग्रस, महागावमध्ये प्रत्येकी ७३ टक्के पेरणीची नोंद झाली आहे.
पावसाने पुन्हा उघडीप दिल्यास उर्वरित क्षेत्रातील पेरणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. उगवलेल्या पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली . झरी-जामणी ५२.४, दारव्हा ३८.५, नेर ३७.२, वणी ३१.३, दिग्रस ३१.०, आर्णी २८.८, पुसद २८.१, केळापूर २५.७, घाटंजी २५.१, महागाव २४.८, यवतमाळ २४.७, कळंब २४.०, उमरखेड २२.८, राळेगाव २२.०, बाभूळगाव १९.०, मारेगाव ९.१, जिल्ह्याची एकूण सरासरी : २८.१ टक्के
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी