
मुंबई बैठकीत नाशिकच्या नगरसेवकांचा उद्धव ठाकरेंना निर्वाळा
नाशिक, 15 जुलै (हिं.स.)।
: नाशिक महानगरपालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी मुंबईतील शिवसेना भवन( मातोश्री) येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत पक्षाशी आपली निष्ठा कायम असल्याचा ठाम शब्द दिला. आम्ही कोणत्याही परिस्थितीत फुटणार नाही आणि पक्षासोबतच राहू, असा स्पष्ट निर्वाळा नगरसेवकांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना दिला. नाशिकमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.नगरसेवकांनी पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करत आगामी काळात पक्षवाढीसाठी अधिक जोमाने काम करण्याची ग्वाही दिली.यावेळी उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांशी सविस्तर संवाद साधला. नाशिकमधील संघटनात्मक परिस्थिती, स्थानिक राजकारण आणि आगामी निवडणुकांची तयारी याबाबत त्यांनी माहिती घेतली. कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवा,जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवा आणि पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचवा, अशा सूचना त्यांनी दिल्या.कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. पक्षाच्या विचारांशी प्रामाणिक राहून अधिक जोमाने कामाला लागा. जनतेमध्ये राहून त्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर द्या, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिल्याचे बैठकीनंतर सांगण्यात आले. नगरसेवकांनीही पक्षप्रमुखांना विश्वास दिला की, नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिक सक्षम करण्यासाठी सर्वजण एकदिलाने काम करतील. पक्षाशी एकनिष्ठ राहून आगामी सर्व राजकीय आव्हानांचा सामना करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. या बैठकीमुळे नाशिकमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नगरसेवकांबाबत सुरू असलेल्या विविध चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे. पक्षप्रमुखांनी दिलेल्या मार्गदर्शनानंतर नगरसेवक नव्या उत्साहाने संघटनात्मक कामात सक्रिय होणार असल्याचेही स्पष्ट झाले. यावेळी शिवसेना सचिव खा.विनायक राऊत, उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, मनपा गटनेते केशव पोरजे तसेच नगरसेवक भारती ताजमपुरे,शैलेश ढगे व पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV