
लातूर, 15 जुलै, (हिं.स.) : लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील अंजली नगर येथे काल रात्री सय्यद नसीर इस्माईल यांच्या घराला आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज सकाळी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी महसूल विभाग व लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाला तातडीने पंचनामा करून आगग्रस्त कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार योग्य ती आर्थिक व इतर आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
या प्रसंगी प्रभागातील नगरसेवक अहमदखान पठाण, नगरसेविका सौ. गोरिबी आसिफ बागवान, सचिन गायकवाड, सौ. कौसर इस्माईल शेख तसेच इतर पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी तत्परतेने पुढाकार घेत अग्निशमन दलाला त्वरित पाचारण केले. त्यांच्या सतर्कतेमुळे आग वेळेत आटोक्यात आली आणि जीवितहानी टळली. तसेच आग इतर ठिकाणी पसरून मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान होण्यापासून बचाव झाला. आग विझवण्यासाठी सर्वांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, लातूर शहरातील सर्व निवासी व व्यावसायिक इमारतींचे नियमित फायर ऑडिट करण्यात यावे. आवश्यक त्या अग्निसुरक्षा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अग्निशमन दलाला कोणत्याही ठिकाणी तातडीने पोहोचता यावे, यासाठी रस्ते व इतर पायाभूत सुविधा सक्षम करण्यात याव्यात,अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. शिवाजी जवळेकर, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदे, नगरसेवक विकास कांबळे तसेच इतर पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis