
पुणे, 15 जुलै, (हिं.स.)। पुणे जिल्हा हा ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक तसेच सांस्कृतिक वारसा लाभलेला असून देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. जिल्ह्यातील पारंपरिक पर्यटन स्थळांबरोबरच अलीकडील काळात विकसित झालेल्या निसर्गरम्य, साहसी, ग्रामीण आणि पर्यावरणपूरक पर्यटन स्थळांची प्रसिद्धी व प्रचार करण्यासाठी नागरिक, पर्यटनप्रेमी, अभ्यासक आणि संबंधित संस्थांनी सहकार्य करावे,त्यांच्याकडे असलेली माहिती पाठवावी असे आवाहन पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाने केले आहे.
पुणे जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात पर्यटन स्थळांची ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक माहिती, संदर्भ, छायाचित्रे, नकाशे, दस्तऐवज, पर्यटन स्थळांची वैशिष्ट्ये, तेथे पोहोचण्याचे मार्ग, उपलब्ध सुविधा, स्थानिक संस्कृती तसेच पर्यटनासाठी योग्य कालावधी आदी माहिती पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालय, पुणे-१ यांच्याकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित माहिती ddtourism.pune-mh@gov.in या ई-मेलवर किंवा ९५११८७४००८ / ८२७५३८७०३२ या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठविता येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु