बडनेरा जुनीवस्तीकडे जाणारे रेल्वेगेट कायमस्वरूपी बंद; नागरिकांमध्ये संताप
उड्डाणपुलाचे लोकार्पण उत्साहात, मात्र पर्यायी मार्गाअभावी शेतकरी, कामगार आणि नागरिकांची गैरसोय अमरावती, 15 जुलै (हिं.स.) । बडनेरा येथील जुनीवस्ती परिसरातील नागरिकांना मंगळवारी पहाटे मोठा धक्का बसला. रेल्वे प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता जुन
बडनेऱ्यात रातोरात रेल्वेफाटक बंद, वाहतुकीचे गंभीर संकट


उड्डाणपुलाचे लोकार्पण उत्साहात, मात्र पर्यायी मार्गाअभावी शेतकरी, कामगार आणि नागरिकांची गैरसोय

अमरावती, 15 जुलै (हिं.स.) । बडनेरा येथील जुनीवस्ती परिसरातील नागरिकांना मंगळवारी पहाटे मोठा धक्का बसला. रेल्वे प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता जुन्यावस्तीकडे जाणारे रेल्वेगेट कायमस्वरूपी बंद केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले नागरिक, शेतमजूर, कामगार तसेच शेतकरी रेल्वेगेटवर पोहोचले असता, तेथे लावलेल्या फलकावर हा मार्ग कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याची माहिती पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

योगायोगाने याच दिवशी नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, परिसराच्या विकासाला चालना मिळेल आणि नागरिकांची गैरसोय दूर होईल, असा दावा लोकप्रतिनिधींनी केला होता. मात्र, प्रत्यक्षात जुन्यावस्तीतील नागरिकांसाठी परिस्थिती अधिकच कठीण झाल्याचे चित्र आहे.

जुन्यावस्तीतील बहुतांश नागरिक हे शेतकरी, शेतमजूर, वीटभट्टी व्यावसायिक तसेच रोजंदारीवर काम करणारे आहेत. पूर्वेकडील रेल्वेगेट हा त्यांच्या दैनंदिन ये-जा करण्याचा प्रमुख आणि सोयीचा मार्ग होता. या मार्गावरून दररोज हजारो दुचाकी, सायकली, बैलगाड्या तसेच मालवाहू वाहने प्रवास करीत होती. हा मार्ग बंद झाल्याने नागरिकांसह स्थानिक उद्योग-व्यवसायांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पावसाळ्यात रेल्वेगेटलगत असलेल्या सुमारे २० मीटर अंतरावरील हिंदू स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता चिखलमय होत असल्याने अंत्ययात्रांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. उड्डाणपूल उभारणीच्या मागील पाच वर्षांच्या कालावधीतही मोठा त्रास सहन करावा लागला, मात्र त्याचा प्रत्यक्ष लाभ जुनीवस्तीला मिळालाच नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. उलट रेल्वेगेट बंद झाल्याने अडचणी आणखी वाढल्याचे त्यांनी नमूद केले.

अंडरपासचे आश्वासन अद्याप अपूर्ण

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, उड्डाणपुलासोबत अंडरपास उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप त्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे अंडरपासचे काम पूर्ण होईपर्यंत जुन्यावस्तीतील नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेगेट वाहतुकीसाठी सुरू ठेवावे किंवा तात्पुरता पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande