
परभणी, 15 जुलै (हिं.स.)।
राज्यातील ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाबाबत सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह, बदनामीकारक व चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी रविराज साबळे उर्फ अण्णासाहेब शेषनाथ साबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात या युनियनचे राज्य अध्यक्ष संजीव निकम व राज्य सरचिटणीस सुचित परत यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन ही राज्यातील ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाची मान्यताप्राप्त संघटना असून राज्यभरातील हजारो ग्रामपंचायत अधिकारी या संघटनेचे सदस्य आहेत. रविराज साबळे यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये राज्यातील संपूर्ण ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाबाबत अत्यंत बेजबाबदार, अपमानास्पद, अश्लील व बदनामीकारक वक्तव्ये केली आहेत. कोणताही पुरावा नसताना राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा सर्वसाधारण आरोप त्यांनी केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या वक्तव्यांमुळे राज्यातील हजारो प्रामाणिक ग्रामपंचायत अधिकार्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला असून संपूर्ण संवर्गाची समाजात बदनामी झाली आहे. तसेच अशा प्रकारच्या बिनबुडाच्या आरोपांमुळे शासन यंत्रणेबाबत नागरिकांमध्ये अविश्वास निर्माण होण्याची शक्यता असून अधिकारी वर्गाविषयी द्वेष व वैमनस्य वाढीस लागण्याचा धोका असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.
संबंधित व्हिडिओ व इतर डिजिटल पुराव्यांची तातडीने तपासणी करून भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील लागू तरतुदींनुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच सामाजिक माध्यमांवरील बदनामीकारक व चिथावणीखोर आशय त्वरित हटविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis