

रायगड, 15 जुलै (हिं.स.)। : मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त गाड्या सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मध्य रेल्वेने मुंबई–पुणे मार्गावरील दोन महत्त्वाच्या गाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
झेडआरयूसीसी व एसआरयूसीसी सदस्य सेंट्रल रेल्वे तसेच भाजप महाराष्ट्र प्रदेश रेल्वे प्रवासी प्रकोष्ठाचे सहसंयोजक आणि कर्जत नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नितीन सोहनलाल परमार यांनी 13 जुलै रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, मुंबई व पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे मुंबई–पुणे मार्गावर अतिरिक्त रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली होती.
मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून अनेक प्रवाशांना स्थानकावरूनच गाडीत चढता येत नसल्याची समस्या त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी इंटरसिटी आणि डेक्कन क्वीन या गाड्या पुन्हा सुरू करण्याची विनंती करण्यात आली होती.
रेल्वे प्रशासनाने या मागणीची दखल घेत उद्या दिनांक 16 जुलैपासून 12127/12128 मुंबई–पुणे–मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस तसेच 12123/12124 मुंबई–पुणे–मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस या दोन्ही गाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, कर्जत, लोणावळा, पुणे मार्गावरील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी घेतलेल्या या निर्णयाबद्दल नितीन परमार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)