
अमरावती, 15 जुलै (हिं.स.) | मेळघाटातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अनेक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे. त्यात अध्यापनाबरोबरच प्रशासकीय आणि शासकीय कामांचा वाढता ताण शिक्षण व्यवस्थेसमोर मोठे आव्हान ठरत आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक शाळांमध्ये एकाच शिक्षकाला सातही वर्गांचे अध्यापन, शालेय प्रशासन, शैक्षणिक नोंदी, पालकांशी समन्वय तसेच शासनाकडून सोपविण्यात येणारी विविध कामे एकाच वेळी पार पाडावी लागत आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्गाला आवश्यक तेवढा अध्यापनाचा वेळ देणे, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणे आणि गुणवत्तावाढीसाठी आवश्यक उपक्रम राबविणे कठीण होत असल्याचे चित्र आहे.
शिक्षकांवर निवडणूक प्रक्रिया, विविध शासकीय सर्वेक्षणे, योजनांची अंमलबजावणी, ऑनलाइन माहिती भरणे, विविध अहवाल तयार करणे आदी अशैक्षणिक कामांचाही मोठा भार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष अध्यापनासाठी उपलब्ध वेळ कमी होत असून अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. मेळघाटातील दुर्गम आणि आदिवासी भागातील अनेक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. एकीकडे शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जात असताना दुसरीकडे अनेक शाळांमध्ये सात वर्गांसाठी एकच शिक्षक, अशी परिस्थिती कायम असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे दुर्गम भागातील रिक्त शिक्षक पदे तातडीने भरणे, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणे व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, अशी मागणी पालक, शिक्षक आणि शिक्षणप्रेमींकडून केली जात आहे.
मेळघाटात शून्य शिक्षकी शाळा तसेच शिक्षकांची कमतरता असलेल्या शाळांसाठी सध्या कंत्राटी तत्त्वावर ८० शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. टप्प्याटप्याने आवश्यक त्या शाळांमध्ये या शिक्षकांची नियुक्ती केली जात असून शिक्षकांची कमतरता कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे गटशिक्षणाधिकारी, बी. आर. गिरासे, चिखलदरा यांनी सांगितले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी