
रायगड, १५ जुलै (हिं.स.) : रायगड जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील आशिर्वाद हाइट्स सोसायटीमध्ये महावितरणकडून रहिवाशांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणचे कर्मचारी सोसायटीत स्मार्ट मीटर बसविण्यासाठी पोहोचल्यानंतर कोणतीही पूर्वकल्पना किंवा रहिवाशांशी चर्चा न करता काम सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी आक्षेप घेतला. प्रथम ग्राहकांना स्मार्ट मीटरबाबत सविस्तर माहिती द्यावी आणि त्यानंतरच मीटर बसवावेत, अशी भूमिका रहिवाशांनी मांडली. यावेळी काही काळ नागरिक आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. तसेच, मीटर बसविण्यास विरोध केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही नागरिकांनी केला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता भगत आणि अपर कार्यकारी अभियंता तायडे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, अभियंता डफळ यांनी संबंधित ग्राहकांना यापूर्वीच नोटीस देण्यात आल्याचा दावा केला.
काही दिवसांपूर्वीही अलिबागमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण होऊन प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी ग्राहकांमध्ये जनजागृती करणे, शंकांचे निरसन करणे आणि प्रभावी संवाद साधणे आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.---------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)