बीडमधील पाळलेल्या गुंडांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करा - खा. बजरंग सोनवणे
बीड, 15 जुलै (हिं.स.)। अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे झालेल्या ज्ञानेश्वर वाकडे यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला आहे. या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार बजरंग सोनवणे यांनी पट्टीवडगाव येथे जाऊन वाकडे कुटुंबीयांची भे
बीडमधील पाळलेल्या गुंडांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करा - खा. बजरंग सोनवणे


बीड, 15 जुलै (हिं.स.)। अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे झालेल्या ज्ञानेश्वर वाकडे यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला आहे. या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार बजरंग सोनवणे यांनी पट्टीवडगाव येथे जाऊन वाकडे कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आणि घटनेची सविस्तर माहिती घेतली. जिल्ह्यात दर एक दिवसाआड घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांवर तीव्र संताप व्यक्त करत, पाळलेल्या गुंडांवर 'एमपीडीए' अंतर्गत कडक कारवाई झाल्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही, अशी परखड भूमिका त्यांनी मांडली. या वाढत्या गुन्हेगारी आणि असुरक्षिततेच्या प्रश्नावर ते लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची भेट घेणार आहेत.

पोलीस निरिक्षक खोकले यांच्यावर पीडित कुटुंबाचे गंभीर आरोप

पीडित कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर खासदार सोनवणे यांनी स्थानिक पोलिसांच्या अत्यंत ढिसाळ आणि संशयास्पद कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. खोकले नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने वाकडे कुटुंबाला वेठीस धरल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. एवढेच नाही तर, घाटनांदूर येथील घटनेत जखमी झालेला तरुण विवेक तारसे याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पोलिसांच्या या अक्षम्य दिरंगाईमुळे त्या तरुणाची प्रकृती आता चिंताजनक बनली असून, या जिवावर बेतणाऱ्या निष्काळजीपणाला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.

तो बॉस कोण?

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी कोणातरी 'बॉस'च्या दबावाखाली काम केल्याचा संशय व्यक्त करत खासदार सोनवणे म्हणाले, या प्रकरणात पोलिसांनी नक्की कोणाचे ऐकले? आरोपी हा पोलिसांचा बॉस कसा? तो 'बॉस' कोण आहे हे समोर आलेच पाहिजे. वाकडे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होईपर्यंत मी शांत बसणार नाही. केवळ प्रत्यक्ष आरोपीच नव्हे, तर त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या पडद्यामागील सूत्रधारांनाही कडक शिक्षा झालीच पाहिजे यासाठी मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेन.

खासदार सोनवणे यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर उपस्थित गावकऱ्यांनी आणि वाकडे कुटुंबीयांनी दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. सर्वसामान्यांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या या गुन्हेगारांवर आणि दबावाखाली काम करणाऱ्या पोलीस प्रशासनावर आता राज्याचा गृह विभाग काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande