
रायगड, 15 जुलै : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा मार्ग वाहनचालक आणि प्रवाशांसाठी मोठ्या गैरसोयीचा ठरत आहे. रस्त्यावर साचणारे पाणी, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, खराब झालेला सर्व्हिस रोड आणि दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका वाढल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही टोलवसुली सुरू करण्यात आल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता उपलब्ध न देता टोल आकारणी करणे अन्यायकारक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. महामार्गाचे उर्वरित काम, सर्व्हिस रोडची दुरुस्ती आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था उभारल्यानंतरच टोलवसुली सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात वडखळ बायपासवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. सर्व्हिस रोडची अवस्था अत्यंत खराब झाल्याने स्थानिक नागरिक, दुचाकीस्वार आणि अन्य वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रश्नाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सर्व्हिस रोडची दुरुस्ती, जलनिस्सारण व्यवस्था आणि दिशादर्शक फलकांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत. कामातील त्रुटींसाठी जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, अशीही मागणी पुढे आली आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)