बचत गटांनी नाविन्यपूर्ण उद्योग उभारून स्वावलंबी व्हावे : राजलक्ष्मी शहा
नाशिक, 15 जुलै (हिं.स.) : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) स्वयं-सहाय्यता गटांनी केवळ बचतीपुरते मर्यादित न राहता नाविन्यपूर्ण उद्योग-व्यवसाय उभारून आर्थिक प्रगती व स्वावलंबन साधावे, असे प्रतिपादन माविमच्या व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शहा
Women should establish


नाशिक, 15 जुलै (हिं.स.) : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) स्वयं-सहाय्यता गटांनी केवळ बचतीपुरते मर्यादित न राहता नाविन्यपूर्ण उद्योग-व्यवसाय उभारून आर्थिक प्रगती व स्वावलंबन साधावे, असे प्रतिपादन माविमच्या व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शहा यांनी केले.

माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती शहा यांनी 13 व 14 जुलै 2026 रोजी नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी कार्यक्रम व्यवस्थापक रूपा मेस्त्री, विभागीय सल्लागार शैलेश पाटील, विभागीय व्यवसाय विकास सल्लागार नवनाथ नाईक तसेच जिल्हा समन्वय अधिकारी उल्हास पाटील उपस्थित होते.

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राजलक्ष्मी शहा यांनी सह्याद्री फार्मला भेट देऊन संस्थेच्या विविध उपक्रमांची पाहणी केली.

सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली.

यानंतर आयोजित बैठकीत नाशिक जिल्ह्यातील सीएमआरसी व्यवस्थापकांकडून सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अधिक परिणामकारक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी आंबेवणी गावाला भेट दिली. यावेळी बचत गटातील महिला, उपप्रकल्पातील लाभार्थी, तेजश्री कर्ज योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू केलेल्या महिला तसेच माविम मित्र मंडळ सदस्यांशी त्यांनी संवाद साधला. बचत गटांमुळे महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांविषयी महिलांनी आपले अनुभव यावेळी मांडले.

महिलांना उद्योग-व्यवसायाची योग्य निवड, व्यवसायातील अडचणींवर मात करण्याचे उपाय, उद्योग विस्ताराची दिशा तसेच सेंद्रिय शेतीतील संधी याबाबत राजलक्ष्मी शहा आणि कार्यक्रम व्यवस्थापक रूपा मेस्त्री यांनी मार्गदर्शन केले.

यानंतर त्यांनी शेती अवजार बँक, मसाला कांडप यंत्र प्रकल्प आणि बटाटा वेफर्स उपक्रमाची पाहणी केली. महिलांनी उद्योग-व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक भांडवल, प्रशिक्षण आणि संस्थात्मक पाठबळ उपलब्ध करून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ कायम सहकार्य करेल, असा विश्वास राजलक्ष्मी शहा यांनी व्यक्त केला.

-----------------------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande