
पुणे, 15 जुलै (हिं.स.)। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा वाढता धोका लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरभर व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम सुरू केली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी स्वच्छता, डास नियंत्रण, जनजागृती आणि आरोग्य तपासणीवर विशेष भर देण्यात आला आहे.
महापालिकेने नागरिकांना घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे, पाणी साचू न देण्याचे तसेच पिण्याचे पाणी उकळून किंवा शुद्ध करून वापरण्याचे आवाहन केले आहे. अन्नपदार्थ झाकून ठेवावेत आणि अस्वच्छतेमुळे संसर्गजन्य आजारांचा प्रसार होऊ नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी पाण्याच्या टाक्या, कुलर, फुलदाण्या, टायर आणि इतर पाणी साचणाऱ्या वस्तूंची नियमित स्वच्छता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आठवड्यातून किमान एकदा अशा ठिकाणांची तपासणी करून पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही सांगण्यात आले.
महापालिकेकडून शहरातील विविध भागांत अळीनाशक औषधांची फवारणी, फॉगिंग, घराघरांत सर्वेक्षण आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच आवश्यक ठिकाणी प्रतिबंधात्मक औषध फवारणी केली जात असून, महापालिकेच्या रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये संशयित रुग्णांची तपासणी आणि उपचाराची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.
महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. ताप, अंगदुखी, उलट्या, जुलाब किंवा इतर संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु