
नागरिकांना वैयक्तिक माहिती न देण्याचे आवाहन
बीड, १६ जुलै (हिं.स.) : भाजप नेत्या तथा माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नावाशी साधर्म्य असलेले आणि त्यांचा फोटो वापरून बनावट फेसबुक खाते तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या खात्यामार्फत अनेकांना व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी लिंक पाठवून वैयक्तिक माहिती मागितली जात असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे.
यासंदर्भात डॉ. प्रीतम मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, संबंधित फेसबुक खाते हे त्यांचे नसून त्यांच्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करून ते तयार करण्यात आले आहे. तसेच Pritam या नावाच्या स्पेलिंगमध्ये i ऐवजी l वापरून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. मुंडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित बनावट खात्याकडून येणाऱ्या कोणत्याही मेसेज, लिंक किंवा फ्रेंड रिक्वेस्टला प्रतिसाद देऊ नये. तसेच कोणत्याही परिस्थितीत आपली वैयक्तिक माहिती किंवा बँकिंगसंबंधित माहिती शेअर करू नये.दरम्यान, या बनावट फेसबुक खात्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सतर्क राहून संशयास्पद सोशल मीडिया खात्यांची त्वरित तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis