
कोल्हापूर, २० जुलै (हिं.स.) : आंबेओहळ मध्यम प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने निकाली काढत सप्टेंबरअखेर पुनर्वसनाची प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पुनर्वसनाच्या कामातील विलंबाबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी पाटबंधारे, पुनर्वसन आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना ऑगस्टअखेर पुनर्वसनासंदर्भातील सर्व बैठका, आवश्यक निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सप्टेंबरअखेर प्रत्यक्ष पुनर्वसनाची अंमलबजावणी पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, समरजितसिंह घाटगे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, संबंधित कार्यकारी अभियंते, जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित कंत्राटदार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
आंबेओहळ प्रकल्पाच्या प्रलंबित कामांसंदर्भात आतापर्यंत ४६ हून अधिक बैठका झाल्याची माहिती देत मंत्री मुश्रीफ यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी ऑगस्टअखेर प्रत्येक प्रकरणावर ठोस निर्णय घेऊन संबंधित विभागांना लेखी अंतिम आदेश जारी करण्याचे निर्देश दिले.
या प्रक्रियेत बेकनाळ आणि बेळकुंदी गावांतील भूसंपादन, उच्च न्यायालयातील प्रलंबित २५ प्रकरणे, संशयास्पद फेरफार व भूसंपादन निवाडे, आर्थिक पॅकेज स्वीकारलेल्या प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप, मौजे कर्पेवाडी येथील प्रकरणे, गडहिंग्लज दिवाणी न्यायालयातील दावे तसेच इतर वैयक्तिक प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar