

रायगड, 20 जुलै (हिं.स.) : विविध स्पर्धा परीक्षा तसेच NEET-UG पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने सोमवारी माणगाव तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार विपीन लोकरे यांना सादर करण्यात आले.
या आंदोलनात ज्येष्ठ नेते सदानंद येलवे, जिल्हा सचिव श्रेयश कांबळे, श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष संताजी पवार, माणगाव तालुकाध्यक्ष राजू रोडेकर, युवक जिल्हाध्यक्ष समाधान म्हात्रे, करण चव्हाण, महाड शहराध्यक्ष पराग वडके, अनिकेत हाटे, कुर्बान खान यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
निवेदनात वारंवार होणाऱ्या स्पर्धा परीक्षा पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार, ऑनलाइन परीक्षा प्रणालीतील त्रुटी तसेच पोलीस भरतीतील अन्यायामुळे लाखो विद्यार्थी आणि बेरोजगार युवकांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात आला.
यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) संबंधित जबाबदारी निश्चित करणे, ब्लॅकलिस्ट कंपन्यांना परीक्षा प्रक्रिया न देणे, ऑनलाइन परीक्षा प्रणालीतील त्रुटी दूर करून पारदर्शक व्यवस्था लागू करणे, पोलीस भरतीतील अन्याय दूर करणे तसेच महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा पुन्हा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची मागणी करण्यात आली.
मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास विद्यार्थी आणि युवकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने देण्यात आला.
--------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)