भारनियमनाच्या निषेधार्थ बोरीतील महावितरण कार्यालयावर ग्रामस्थांचा मोर्चा
परभणी, 20 जुलै (हिं.स.) : जिंतूर तालुक्यातील करवली, कोक, रोहिला पिंपरी आणि कसर या गावांतील शेकडो नागरिकांनी महावितरणकडून सुरू असलेल्या भारनियमनाच्या निषेधार्थ सोमवारी बोरी येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी उपअभियंत्यांना निवेदन सादर क
भारनियमनाविरोधात बोरीतील ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा ; वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी


परभणी, 20 जुलै (हिं.स.) : जिंतूर तालुक्यातील करवली, कोक, रोहिला पिंपरी आणि कसर या गावांतील शेकडो नागरिकांनी महावितरणकडून सुरू असलेल्या भारनियमनाच्या निषेधार्थ सोमवारी बोरी येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी उपअभियंत्यांना निवेदन सादर करून भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलकांनी वारंवार होणाऱ्या वीज कपातीमुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली. निवेदनानुसार, अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतीची कामे, विद्यार्थ्यांचा अभ्यास, लघुउद्योग आणि दैनंदिन व्यवहार विस्कळीत होत असून, ग्रामीण भागात कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

यावेळी ग्रामस्थांनी भारनियमन तात्काळ बंद करणे, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करणे तसेच पावसाळ्यात विद्युत अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी महावितरण प्रशासनाकडे केली.

दरम्यान, बोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एन. थोरवे यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला. शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आपल्या समस्या मांडाव्यात, प्रशासनाकडून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

आंदोलनादरम्यान काही युवकांनी शाखा अभियंता रोकडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून नागरिकांच्या समस्या मांडल्या. यावर भारनियमन बंद करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन रोकडे यांनी दिले. यावेळी महावितरणचे कर्मचारी सुधाकर संगेकर यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande