
परभणी, 16 जुलै (हिं.स.)।
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणारे धान्य भारतीय अन्न महामंडळ (FCI) व शासनाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार प्राप्त होऊन संबंधित गोदामांमार्फत रास्तभाव दुकानदारांना उपलब्ध करून दिले जाते.
लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा निकृष्ट दर्जाचा अथवा खाण्यायोग्य नसलेला धान्यसाठा वितरित होऊ नये, याबाबत पुरवठा विभाग कटिबद्ध असून धान्य वितरण प्रक्रियेवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. हवामानातील बदलामुळे क्वचित प्रसंगी कुठे धान्य खराब झाले असल्यास ते धान्य त्वरीत बदलून देण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच शासनाच्या निर्देशानुसार एप्रिल ते जून 2026 या महिन्याचे धान्य एकत्रित वाटण्यात येणार होते, मात्र परभणी जिल्ह्याकरिता नियुक्त तत्कालीन वाहतूक कंत्राटदाराकडून एप्रिल महिन्याचे वेळेत धान्य उचल करून पोहचवण्यात आले नाही. त्यामुळे नवीन वाहतूक कंत्राटदार नियुक्त करण्यात आला आहे. परंतु एप्रिल 2026 च्या धान्य वितरणास ई - पॉस मशीन वर 15 मे 2026 पर्यंत मुदत होती, कंत्राटदाराकडून धान्य न पोहचल्यामुळे पूर्णा शहरातील काही लाभार्थ्यांना मुदतीत धान्याचे वितरण होऊ शकले नाही. सदर धान्य वितरणास ई-पॉस मशीनवर मुदत वाढ मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांना धान्य वितरणाबाबत अधिक दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लाभार्थ्यांना दर्जेदार धान्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis