

रायगड, 20 जुलै (हिं.स.)। देशभर गाजत असलेल्या NEET-UG परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आजाद समाज पार्टी (कांशीराम)च्या वतीने सोमवारी नेरळ पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी वरुटे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व कोकण प्रभारी ॲड. सुमित साबळे यांनी केले. सम्राट नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातून कार्यकर्ते, विद्यार्थी व युवक मोर्चाच्या स्वरूपात नेरळ पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर प्रभारी अधिकारी वरुटे यांच्याकडे निवेदन सादर करून केंद्र सरकारकडे मागण्या पाठविण्याची विनंती करण्यात आली.
निवेदनात NEET-UG पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी श्री. सोनम वांगचुक आणि श्री. अभिजीत दीपके यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला आजाद समाज पार्टीच्या वतीने जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड मान्य नाही, NEET-UG पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करा, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या तसेच भाई चंद्रशेखर आझाद, आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, विद्यार्थी, युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते आणि संविधानवादी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रकरणात केंद्र सरकारने तातडीने ठोस भूमिका घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली.
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)