
रायगड, 16 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-2026’ साठी इच्छुक उद्योजकांकडून नामांकन अर्ज मागविण्यात आले आहेत. ग्रामीण भागात शासकीय योजनांच्या माध्यमातून यशस्वी उद्योग उभारून रोजगारनिर्मिती करणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्यासाठी हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो.
यंदा या पुरस्कार योजनेचे चौथे वर्ष असून, अधिकाधिक पात्र उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने केले आहे.
राज्यात ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी तसेच नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सन 2023 पासून ही पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गुणवंत उद्योजकांचा सन्मान करण्यात येतो.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजनांमधून आर्थिक सहाय्य घेऊन यशस्वी उद्योग उभारणाऱ्या आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणाऱ्या उद्योजकांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे.
नामांकन प्रक्रिया 13 जुलै 2026 पासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 28 जुलै 2026 आहे. इच्छुक उद्योजकांनी विहित मुदतीत आपले अर्ज सादर करावेत.
नामांकन अर्ज महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या संकेतस्थळावर तसेच जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. अर्जासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल.
अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र इमारत, ठिकरुळ नाका, रायगड बाजारजवळ, अलिबाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)