
रायगड, 16 जुलै (हिं.स.)। : खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहिवली गावातील पाटील कॉलनी परिसरात रूममध्ये झोपण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खोपोली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्ती ही इंसाबे फाटा येथील घोसाळकर कॉलनीमध्ये राहत होती. मात्र, तो आरोपीच्या पाटील कॉलनीतील रूममध्ये झोपण्यासाठी गेला होता. आरोपीने त्याला रूममध्ये झोपण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.
वादाच्या भरात आरोपीने मयताच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केला. गंभीर जखमी झालेला मयत तेथून निघून गेला. त्यानंतर जे.पी. पॅलेस हॉटेललगत असलेल्या बंद दुकानाच्या गाळ्यात तो रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आला. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे व अतिरक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणातील आरोपीला १५ जुलै २०२६ रोजी रात्री ८.३३ वाजता अटक करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)