
लातूर, 16 जुलै, (हिं.स.)। चाकूर पंचायत समितीच्या कामकाजाबाबत कोणत्याही नागरिकाला तक्रार अथवा अडचण असल्यास ती थेट माझ्याकडे मांडावी. प्रत्येक तक्रारीची निष्पक्ष दखल घेऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती जयश्री मच्छिंद्र नागरगोजे यांनी केले. चाकूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पंचायत समितीतील कथित भ्रष्टाचाराबाबत होत असलेल्या आरोपांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडत, हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे सांगितले.
लोकप्रतिनिधींनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच्या प्रशासक काळातील कामकाजाशी सध्याच्या पदाधिकाऱ्यांचा संबंध जोडून दिशाभूल केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. 'पंचायत समितीच्या कामकाजात पारदर्शकता आणि शिस्त आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नागरिकांनी कोणतीही सम स्या असल्यास सभापती, उपसभापती किंवा सदस्यांशी थेट संपर्क साधावा. प्रत्येक तक्रारीचे प्रामाणिकपणे निराकरण केले जाईल,' असे त्या म्हणाल्या. यावेळी उपसभापती भुजंग शिंदे यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळेच त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. नवीन गटविकास अधिकारी रुजू झाल्यानंतर नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, नियमबाह्य पद्धतीने बिले काढल्याचे आरोपही त्यांनी फेटाळून लावत, 'पुरावे असतील तर ते समोर आणावेत,' असे आव्हान विरोधकांना दिले
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis