
लातूर, 16 जुलै, (हिं.स.)। राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चाकूर तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान हणमंतवाडी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी समाज कल्याण विभागामार्फत उभारण्यात येत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृह इमारत बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. हे बांधकाम पूर्णपणे दर्जेदार, विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
वसतिगृह इमारत बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करताना त्यांनी कामाचा वेग, वापरण्यात येणारे साहित्य आणि एकूण गुणवत्ता याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उभारण्यात येणाऱ्या अशा महत्त्वपूर्ण शासकीय प्रकल्पांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी दर्जेदार कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी उपस्थित असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या सद्यस्थितीची व प्रगतीची माहिती दिली. या पाहणी दौऱ्याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य भानुदास पोटे, अनिल वाडकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis