लातूर - बोंबळी खुर्द येथे धाडसी घरफोडी; ८ तोळे सोने व ७० हजारांची रोकड लंपास
लातूर, 16 जुलै, (हिं.स.)। देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी घरफोडी करून सुमारे ८ तोळे सोन्याचे दागिने व ७० हजार रुपयांची रोकड असा अंदाजे १२ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावासह परिसरात भ
घरफोडी


लातूर, 16 जुलै, (हिं.स.)। देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी घरफोडी करून सुमारे ८ तोळे सोन्याचे दागिने व ७० हजार रुपयांची रोकड असा अंदाजे १२ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी ज्ञानोबा विठ्ठल भोसले यांच्या पत्नी पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी गेल्या असल्याने त्या घरी नव्हत्या. घराला मुख्य दरवाजा नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरात प्रवेश केला. त्यानंतर कुलूपबंद खोलीचे कुलूप तोडून कपाटातील ८ तोळे सोन्याचे दागिने व ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. घटनेच्या वेळी ज्ञानोबा भोसले, त्यांचे चिरंजीव भगवान ज्ञानोबा भोसले तसेच कुटुंबातील महिला व लहान मुले घरातील दुसऱ्या खोलीत झोपलेले होते. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी या दोन्ही खोल्यांचे दरवाजे बाहेरून बंद करून कुटुंबीयांची कोंडी केली होती.

पहाटे ज्ञानोबा भोसले यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता तो बाहेरून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ शेजाऱ्यांशी मोबाईलद्वारे संपर्क साधून दरवाजा उघडून घेतला. त्यानंतर घरातील कपाट उघडे असल्याचे व त्यातील सोन्याचे दागिने व रोकड चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी तातडीने देवणी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच देवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपासासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले असून, श्वानपथकाने परिसराची पाहणी करून संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande