
परभणी, 16 जुलै (हिं.स.)।
देशातील विविध स्पर्धा व प्रवेश परीक्षांमधील वाढत्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात प्राण प्रतिष्ठानच्या वतीने आज गुरुवार 16 जूलै रोजी परभणी जिल्हाधिकार्यांमार्फत देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, विविध परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, देशातील विविध महत्त्वाच्या परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि भवितव्याचे नुकसान होत आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी सरकारकडून विद्यार्थी आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, या विषयात तातडीने हस्तक्षेप करावा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, अन्यथा परभणी जिल्ह्यातील युवकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. तसेच, सामाजिक कार्यकर्ते व वैज्ञानिक सोनम वांगचुक यांचे जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या उपोषणाची दखल केंद्र सरकारने घ्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
यावेळी आशिष वाकोडे, अजय रसाळ, सुधीर साळवे, राजेश रणखांबे, मिलिंद खिल्लारे, अॅड. यशोधरा गायकवाड आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis