
बीड, 16 जुलै, (हिं.स.)। बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यात यावे, बीड ते मुंबई दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी तसेच नव्याने सर्वेक्षणास मंजुरी मिळालेल्या येडशी ते छत्रपती संभाजीनगर लोहमार्गाच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समितीचे अध्यक्ष जवाहरलाल सारडा यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे केली.
यावेळी शिष्टमंडळामध्ये समितीचे अध्यक्ष जवाहरलाल सारडा, उपाध्यक्ष अशोक शेटे, सहसचिव रवी उबाळे, कोषाध्यक्ष विष्णूदास बियाणी, ज्येष्ठ मार्गदर्शक सत्यनारायण लाहोटी आणि सुरेश मेखे, डॉ. अरुण भस्मे, शिवाजीराव जाधव, राजु बंब, भाऊसाहेब चंदनशिव, शांतीलाल पटेल यांची उपस्थिती होती. या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन विविध रेल्वे प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली. मराठवाडधाच्या विकासासाठी रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होणे आवश्यक असून प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याची गरज असल्याचे शिष्टमंडळाने यावेळी नमूद केले.
अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर बीड जिल्ह्याच्या औद्योगिक, शैक्षणिक, कृषी, व्यापार आणि सेवा क्षेत्रांना चालना मिळेल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच बीड-मुंबई थेट रेल्वे सेवा सुरू झाल्यास जिल्ह्यातील प्रबासी, विद्यार्थी, व्यापारी तसेच रोजगार आणि व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्याचा लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शिष्टमंडळाच्या मागण्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचवून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis