आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी डॉक्टरांची निस्वार्थ आरोग्यसेवा
अलिबाग-मुरुड असोसिएशन आणि न्यू लाईफ डॉक्टर असोसिएशनच्या उपक्रमात हजारो वारकऱ्यांना दिलासा रायगड, 16 जुलै (हिं.स.) : आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यात विठ्ठलनामाच्या गजरात पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी अलिबाग-मुरुड असोसिएशन आणि न्यू लाईफ डॉक्ट
Doctors-provide-selfless-healt


Doctors-provide-selfless-healt


अलिबाग-मुरुड असोसिएशन आणि न्यू लाईफ डॉक्टर असोसिएशनच्या उपक्रमात हजारो वारकऱ्यांना दिलासा

रायगड, 16 जुलै (हिं.स.) : आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यात विठ्ठलनामाच्या गजरात पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी अलिबाग-मुरुड असोसिएशन आणि न्यू लाईफ डॉक्टर असोसिएशनच्या डॉक्टरांनी यंदाही निस्वार्थ भावनेतून मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली.

अनेक वर्षांपासून हे डॉक्टर स्वतःचे दवाखाने आणि वैद्यकीय व्यवसाय काही दिवसांसाठी बाजूला ठेवून वारीत सहभागी होत आहेत. वारकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारत ते सातत्याने सेवा बजावत आहेत.

यंदाच्या आयोजित आरोग्य शिबिरात एक हजाराहून अधिक वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले. पायी प्रवासामुळे होणारा थकवा, पायांना आलेले फोड, अंगदुखी, ताप, किरकोळ जखमा तसेच इतर आरोग्यविषयक तक्रारींवर तातडीने उपचार करण्यात आले. यावेळी प्रथमोपचार, वेदनाशामक औषधे, मलमपट्टी तसेच आवश्यक औषधांचे मोफत वितरण करण्यात आले.

या सेवाकार्यात डॉ. रविंद्र म्हात्रे, डॉ. रेखा म्हात्रे, डॉ. राजेंद्र मोकल, डॉ. रविंद्र वालेकर, डॉ. मनोज पाटील (नारंगी), डॉ. हरीश भगत, डॉ. मनोज पाटील (मानकुळे), डॉ. अक्षय पाटील, डॉ. बैकर आणि वृंदा मोकल यांनी सक्रिय सहभाग घेत मोलाचे योगदान दिले.

“समाजसेवा आणि मानवसेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेतून डॉक्टरांनी अहोरात्र सेवा बजावत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. त्यांच्या या निस्वार्थ सेवाभावाबद्दल वारकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली असून, या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून वारीतील भक्ती आणि समाजसेवेचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande