
बीड, 16 जुलै (हिं.स.) : बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ विद्यालयातील शिक्षक आणि संस्थाचालकांमधील वादाचा फटका आता थेट विद्यार्थ्यांना बसत आहे. गेल्या महिनाभरापासून नियमित अध्यापन बंद असल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी (दि. 16) शाळेच्या मैदानात उतरून आंदोलन केले.
‘आम्हाला शिक्षण द्या, आमचे तास घ्या’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी वर्ग नियमित सुरू करण्याची मागणी केली. परळीतील गणेश पार परिसरातील वैद्यनाथ विद्यालयात शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न आणि मागील सहा महिन्यांपासून रखडलेल्या वेतनाचा मुद्दा अद्याप निकाली न निघाल्याने अनेक शिक्षक शाळेत गैरहजर राहत आहेत.
यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, महिनाभर वर्ग न भरल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गुरुवारी सकाळी प्रार्थनेनंतर विद्यार्थ्यांनी थेट शाळेच्या मैदानात एकत्र येत शिक्षण सुरू करण्याची मागणी केली.
विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीमुळे संपूर्ण शाळा परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांनी नियमित अध्यापन सुरू करण्याची मागणी कायम ठेवली.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis