खरीप पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन
रायगड, 16 जुलै (हिं.स.)। अलिबाग : खरीप हंगामातील भात आणि नाचणी (रागी) पिकांच्या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यास
Farmers urged to participate in the Kharif crop competition.


रायगड, 16 जुलै (हिं.स.)। अलिबाग : खरीप हंगामातील भात आणि नाचणी (रागी) पिकांच्या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांनी केले आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती स्वतः कसत असणे आवश्यक आहे. भात पिकासाठी किमान २० गुंठे, तर नाचणीसाठी सलग ४० गुंठे क्षेत्रावर लागवड असणे बंधनकारक आहे. एका शेतकऱ्याला एकापेक्षा जास्त पिकांसाठी अर्ज करता येणार आहे.

अर्जासोबत विहीत नमुन्यातील अर्ज, प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२ उतारा, ८-अ उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र, क्षेत्राचा चिन्हांकित नकाशा तसेच बँक खाते चेक किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

भात व नाचणी पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट असून, सर्वसाधारण गटासाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये आणि आदिवासी गटासाठी १५० रुपये आहे.तालुका पातळीवर पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपये बक्षीस दिले जाईल. जिल्हा पातळीवर १० हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपये, तर राज्य पातळीवर अनुक्रमे ५० हजार, ४० हजार आणि ३० हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande