
यवतमाळ, 16 जुलै (हिं.स.)। पांढरकवडा तालुक्यातील मोहदा गावात बुधवार मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी अत्यंत धाडसी दरोडा टाकला. गावातील मध्यवर्ती भागात असलेल्या दोन नामांकित सराफा दुकानांना लक्ष्य करत चोरट्यांनी तब्बल १ कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. एकाच रात्री, एकाच वेळी दोन मोठी सराफा दुकाने फोडल्याच्या या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
चोरट्यांनी मोहदा गावातील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या संतोष वर्मा यांच्या ‘राजेंद्र ज्वेलर्स’ आणि त्यांच्याच शेजारी असलेल्या धर्मेंद्र वर्मा यांच्या ‘वर्मा ज्वेलर्स’ या दोन प्रतिष्ठानांना लक्ष्य केले. पहाटे, जेव्हा संपूर्ण गाव गाढ झोपेत होते, तेव्हा चोरट्यांनी या दुकानांचे शटर आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. अत्यंत सराईतपणे अवघ्या २० मिनिटांत त्यांनी दोन्ही दुकानांमधील मौल्यवान ऐवज गोळा करून पळ काढला.
चोरट्यांनी सर्वप्रथम संतोष वर्मा यांच्या ‘राजेंद्र ज्वेलर्स’चे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील तिजोरी आणि लॉकरचा ताबा घेत त्यांनी आत ठेवलेले सुमारे ६०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २० किलो चांदीचे दागिने व विटा लंपास केल्या. इतकेच नव्हे तर, दुकानात सुरक्षित ठेवलेली १२ लाख रुपयांची रोकडही चोरट्यांनी बॅगेत भरली.
त्यानंतर, चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारीच असलेल्या धर्मेंद्र वर्मा यांच्या ‘वर्मा ज्वेलर्स’कडे वळवला. या दुकानातून प्राथमिक माहितीनुसार सुमारे १० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्ही दुकानांतील मिळून एकूण १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.हा संपूर्ण थरारक दरोडा दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, या गुन्ह्यात एकूण पाच आरोपींचा सहभाग असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. चोरट्यांनी तोंडाला कापड बांधले होते आणि त्यांच्या हालचालींवरून ते सराईत गुन्हेगार असावेत, असा संशय आहे.
या दरोड्याचे सर्वात धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे, चोरी केल्यानंतर पाचही आरोपींनी गावातून पळ काढला आणि गावालगतच असलेल्या एका निर्जन शेतात आसरा घेतला. चोरीचा माल घेऊन दूर पळण्याऐवजी त्यांनी आधी त्याच शेतात बसून सोन्याचे दागिने आणि १२ लाख रुपयांच्या रोकडची आपापसात समसमान वाटणी केली. विशेष म्हणजे, चोरी करताना घाईगडबडीत त्यांच्या हाती काही ‘बेंटेक्स’चे दागिनेही लागले होते. ते दागिने तिथेच शेतात फेकून दिले आणि दुचाकीवरून वेगवेगळ्या दिशेने पसार झाले.
आज सकाळी दुकानांचे कुलूप तुटल्याचे आणि चोरी झाल्याचे उघडकीस येताच परिसरात एकच गर्दी झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांनी तात्काळ पांढरकवडा पोलिसांच्या पथकासह घटनास्थळाला भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली. तपासाला गती देण्यासाठी यवतमाळहून न्यायवैद्यक तज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. फॉरेन्सिक टीमने दुकानाच्या शटरवरून, काउंटरवरून आणि फेकून दिलेल्या बेंटेक्स दागिन्यांवरून चोरट्यांच्या बोटांचे ठसे घेतले आहेत. पांढरकवडा पोलिसांकडून सध्या घटनास्थळाचा पंचनामा करण्यात करून अज्ञात ५ चोरट्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला.
मोहदा येथे पडलेल्या या दरोड्यामुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आणि भीतीचे वातावरण आहे. पोलीस गस्त योग्य असती, तर एवढा मोठा दरोडा पडला नसता,अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. पांढरकवडा पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यासाठी विविध भागात पथके रवाना केली असून, परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रघुपती आणि सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत खंदारे करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी