
रायगड, 16 जुलै (हिं.स.) : खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कुंभिवली येथील हिंदुस्थान आयनॉक्स लिमिटेड कंपनीच्या वायर प्लँटमध्ये काम करत असताना एका कामगाराचा मशिनमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी कंपनीतील जबाबदार तीन व्यक्तींविरोधात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कामगार हा हिंदुस्थान आयनॉक्स लिमिटेडच्या वायर प्लँटमधील ओ.टी.ओ.-४ मशिनवर नाईट शिफ्टमध्ये ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. काम सुरू असताना त्याचे बोट मशिनमध्ये अडकले आणि तो मशिनमध्ये खेचला गेला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेस कंपनी व्यवस्थापनाची निष्काळजीपणा आणि सुरक्षिततेकडे झालेले दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणे, सेफ्टी ऑफिसरची नियुक्ती न करणे तसेच आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध न करून देता कामगाराकडून मशिनवर काम करून घेणे, अशा कारणांवरून संबंधितांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.
या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम १०६(१) आणि ३(५) अंतर्गत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास खालापूर पोलीस करीत आहेत.
------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)