
अमरावती, 16 जुलै (हिं.स.) : स्थानिक रुख्मिणीनगर भागातील साई हॉस्पिटलजवळ अवघ्या १० वर्षांच्या एका निरागस बालिकेवर भटक्या कुत्र्याने अत्यंत भीषण हल्ला केला. या भटक्या श्वानाने बालिकेच्या चेहऱ्याचे अक्षरशः लचके तोडून तिला मरणप्राय यातना दिल्या आहेत. या भयंकर घटनेमुळे संपूर्ण अमरावती शहरात प्रचंड संतापाचा डोंब उसळला असून, या श्वान हल्ल्याला अमरावती महानगरपालिका प्रशासनच जबाबदार असल्याची जहाल टीका नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी केली आहे.
एका खाजगी गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या सचिन कावरे यांची १० वर्षांची मुलगी सनिदी हिच्यावर हा भीषण प्रसंग ओढवला. रुख्मिणीनगर परिसरात सनिदीच्या चेहऱ्याचे भटक्या कुत्र्याने भयंकर लचके तोडले. या कोवळ्या वयातील चिमुरडीला त्या हिंस्त्र श्वानासमोर स्वतःचा बचावही करता आला नाही आणि ती पूर्णपणे हतबल झाली. या हल्ल्यात तिचा चेहरा रक्ताळला असून तिला अत्यंत गंभीर अवस्थेत तातडीने जवळच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अमरावतीकरांमध्ये तीव्र असंतोषसनिदीवर झालेल्या या अमानुष श्वानहल्ल्यानंतर तिच्या जखमी अवस्थेतील आणि चेहऱ्याचे लचके तोडलेले फोटो सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाले. हे मन हेलावून टाकणारे फोटो समोर आल्यानंतर अमरावतीकरांमधून मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मनपा आमसभेतील 'पोलखोल' आणि अधिकाऱ्याची लाचखोरीयापूर्वी महापालिकेच्या आमसभेत नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी पशुवैद्यकीय विभागाची चांगलीच शाळा घेतली होती. मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचा सोयीस्कर दाखला देत भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची आपली जबाबदारी टाळत असल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला होता. त्यावेळी त्यांनी आजवर भटक्या प्राण्यांचे नियंत्रण, लसीकरण आणि श्वान निर्बीजीकरणावर किती खर्च झाला, याचा संपूर्ण लेखाजोखा मागितला होता. श्वान निर्बीजीकरणावर लाखो रुपये खर्च होऊनही शहरात श्वानांची संख्या का वाढत आहे? असा रोकडा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाचा बुरखा फाडला होता.विशेष म्हणजे, यानंतर काही दिवसांतच महानगरपालिकेचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरीच्या प्रकरणात अटक केली होती. डॉ. बोंद्रे यांनी श्वान निर्बीजीकरणाच्या कामांचे ४७ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी कंत्राटदाराकडे तब्बल २५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊनही प्रशासन ढिम्मच!पशुवैद्यकीय विभागातील मोठा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतरही मनपा प्रशासन ढिम्म राहिले आहे. संपूर्ण अमरावतीकर भटक्या श्वानांच्या दहशतीखाली आणि त्यांच्या चाव्यांमुळे भयभीत झाले आहेत. असे असतानाही, श्वान निर्बीजीकरणाचे रखडलेले कंत्राट देण्याची प्रक्रिया मनपाने अद्यापही सुरू केली नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
सनिदीचा वैद्यकीय खर्च मनपाने उचलावा: अनिल अग्रवाल यांची मागणीहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सनिदी कावरे हिच्या पालकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. मनपाच्या पशुवैद्यकीय विभागाने जर भटक्या श्वानांविरुद्ध वेळीच योग्य पावले उचलली असती, तर आज सनिदीचा चेहरा विद्रूप झाला नसता, असा थेट आरोप अनिल अग्रवाल यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाला मनपाचे असंवेदनशील प्रशासनच पूर्णपणे जबाबदार असल्याने, सनिदीचा औषधोपचाराचा सर्व खर्च 'विशेष बाब' म्हणून महापौर आणि आयुक्तांनी आपल्या विशेष अधिकारात तिच्या पालकांना द्यावा, अशी आग्रही मागणी नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी