
निमा बैठकीत दरमहा उद्योग–पोलीस समन्वय बैठकीचे आश्वासन
नाशिक, 16 जुलै (हिं.स.)।
: उद्योजक हा देशाच्या आर्थिक विकासाचा कणा असून उद्योगांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हे पोलीस प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. उद्योग क्षेत्राशी संबंधित समस्या तातडीने सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन आणि औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींची दरमहा समन्वय बैठक अथवा ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिले.
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन जिल्ह्यातील औद्योगिक सुरक्षेसंदर्भात आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांच्या हस्ते डॉ. स्वामी यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी निमाचे अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष मनीष रावल व किशोर राठी, सचिव राजेंद्र अहिरे, पोलिस निरीक्षक रवींद्र मगर व दत्तात्रय शिंदे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहसचिव किरण पाटील, संतोष मंडलेचा उपस्थित होते.
बैठकीत औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, पोलीस–उद्योजक समन्वय तसेच आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
डॉ. स्वामी म्हणाले की, दिंडोरी व सिन्नर एमआयडीसी परिसरातील चोऱ्या, अवैध दारू विक्री, टपऱ्यांवरील गैरप्रकार आणि इतर गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस गस्त अधिक प्रभावी करण्यात येईल. संबंधित अधिकाऱ्यांना नियमित स्पॉट तपासणी करण्याच्या सूचना दिल्या जातील. उद्योजकांनीही पोलीस प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या प्रत्येक संस्थेत POSH अंतर्गत तक्रार समिती असणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या सुरक्षेसाठी भरोसा सेंटर व दामिनी पथके कार्यरत असून शाळा, आश्रमशाळा, स्कूल बस सुरक्षा, कर्मचारी चारित्र्य पडताळणी तसेच महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत नियमित पेट्रोलिंग आणि समुपदेशन सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
डिजिटल फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांपासून उद्योग व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने सायबर साक्षरता कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
महामार्ग सुरक्षा, ११२ हेल्पलाईन आणि सीसीटीव्ही नेटवर्कवर भर
महामार्ग व पर्यटनस्थळांवरील सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी ११२ हेल्पलाईनचा वापर करावा, असे आवाहन डॉ. स्वामी यांनी केले. उद्योगांनी नियुक्त केलेले सुरक्षा रक्षक सक्षम व प्रशिक्षित असावेत तसेच त्यांची चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
औद्योगिक परिसरातील सर्व उद्योजकांनी एकत्रितपणे संपूर्ण परिसर व्यापेल अशा पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारावे. शक्य असल्यास त्यासाठी एकत्रित कंट्रोल रूम उभारल्यास सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी उद्योगांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले. उद्योग आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाल्यास सुरक्षित, सक्षम आणि गुंतवणुकीस पोषक औद्योगिक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास नहार यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV