
नाशिक, 16 जुलै, (हिं.स.)। नाशिक - मुंबईदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या. हजारो प्रवाशांच्या गैरसोयीचा मुद्दा उपस्थित करत खासदार राजाभाऊ वाजे यांनी पंचवटी एक्स्प्रेससाठी स्वतंत्र रेक उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवून सध्या सुरू असलेल्या हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेससोबतची रेक शेअरिंग व्यवस्था तातडीने बंद करण्याची विनंती केली आहे.
पंचवटी एक्स्प्रेस ही नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाची रेल्वेसेवा मानली जाते. दररोज हजारो नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्ण या गाडीने नाशिक-मुंबईदरम्यान प्रवास करतात. मात्र हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेससोबत रेक शेअरिंग होत असल्याने एका गाडीच्या विलंबाचा परिणाम दुसऱ्या गाडीवरही होत आहे. त्यामुळे पंचवटी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर वारंवार परिणाम होत असून, प्रवाशांना मोत गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
व्यावसायिकांच्या विशेषतः पावसाळ्यात रेल्वे वाहतुकीत होणाऱ्या अडथळ्यांमुळे विलंबाचे प्रमाण अधिक वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी नोकरदारांचे कार्यालयीन कामकाज, बैठका, विद्यार्थ्यांचे वेळापत्रक तसेच रुग्णांच्या वैद्यकीय भेटींवर परिणाम होत असल्याची बाब खासदार वाजे यांनी पत्रात नमूद केली आहे. पंचवटी एक्स्प्रेसला स्वतंत्र रेक उपलब्ध करून दिल्यास गाडीची वक्तशीरता वाढण्यास मदत होईल आणि प्रवाशांना अधिक विश्वासार्ह सेवा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV