
बीड, 16 जुलै (हिं.स.) : बीड शहरात आज अचानक झालेल्या एका मोठ्या गूढ आवाजामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विविध भागांमध्ये हा आवाज ऐकू आल्याचा दावा अनेक नागरिकांनी केला असून, या आवाजाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आवाज ऐकताच अनेक नागरिक घराबाहेर आले. काही नागरिकांनी हा स्फोटाचा आवाज असण्याची शक्यता व्यक्त केली, तर काहींनी लष्करी विमान, ध्वनीतरंग (सोनिक बूम) किंवा इतर तांत्रिक कारणांचा अंदाज व्यक्त केला. मात्र, यापैकी कोणत्याही कारणाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, सोशल मीडियावर या आवाजाबाबत विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. मात्र प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून अधिकृत माहिती मिळेपर्यंत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.या गूढ आवाजाचे नेमके कारण काय होते, याकडे संपूर्ण बीडकरांचे लक्ष लागले असून प्रशासनाकडून लवकरच याबाबत स्पष्टीकरण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis