
लातूर, 16 जुलै, (हिं.स.)। अहमदपूर तालुक्यातील गुंजोटी येथील ८० वर्षीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लिंबाजी पी. भुजंगराव नाईकवाडे यांनी आपल्या राहत्या जागेचा प्रश्न गेली २५ वर्षे प्रलंबित असल्याचे सांगत, आज १६ जुलै २०२६ रोजी सकाळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, गुंजोटी येथे आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
तहसीलदार अहमदपूर आणि संबंधित प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नाईकवाडे यांनी नमूद केले आहे की, ते गेल्या दोन दशकांहून अधिक काळ संबंधित जागेवर वास्तव्यास आहेत, परंतु अद्याप ती जागा त्यांच्या नावावर करण्यात आलेली नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची व्यथा त्यांनी मांडली आहे. यासोबतच, घराकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्नही कायम असल्याने पावसाळ्याच्या दिवसांत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
वृद्धापकाळात स्वतःच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने, प्रशासनाने यावर लवकरात लवकर ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जोपर्यंत जागा नावावर होत नाही आणि रस्त्याची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. नाईकवाडे यांच्या या आंदोलनामुळे गुंजोटी परिसरात चर्चेचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांना पाठिंबा व्यक्त करत आहेत. आता याप्रकरणी प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis