

नाशिक, 16 जुलै (हिं.स.)।
भक्ती, सेवा व सामाजिक ऐक्याचा संदेश देत श्री जगन्नाथ रथोत्सव गुरुवारी श्री जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव समिती पंचवटीतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. पंचमुखी हनुमान मंदिर येथे शृंगार, पूजा व आरती झाल्यानंतर भगवान जगन्नाथ, बंधू बलभद्र व भगिनी सुभद्रा यांच्या मूर्ती रथात विराजमान केल्यानंतर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कैलास मठाचे स्वामी संविदानंद सरस्वती, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, स्थायी समितीचे सभापती मच्छिन्द्र सानप, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, माजी आमदार बाळासाहेब सानप, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत रथायात्रेचा प्रारंभ झाला.
रथोत्सवात खाकी आखाड्याचे महंत भगवानदास महाराज, मधुसूदन काबरा, धनंजय बेळे, नंदू कहार, बाळासाहेब पाठक, सचिन लाटे, राहूल बर्वे आदी सहभागी झाले होते.
पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत डॉ. भक्तीचरणदास महाराज यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली निघालेल्या या रथाच्या पुढे बँड पथक, मैदानी खेळ पथक, मृदुंग, हनुमान निशाण, देवदेवतांच्या वेशभूषा करून काही भाविक सहभागी झाले. रथाच्या मार्गात ठिकठिकाणी रथाचे स्वागत व पूजन करण्यात आले.
रथ पंचमुखी हनुमान मंदिर, जुना आडगाव नाका, गणेशवाडी, गाडगे महाराज पूल, नेहरू चौक, मेनरोड, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, शिवाजी चौक, नागचौक, कृष्णनगर येथून येऊन पंचमुखी हनुमान मंदिर येथे समारोप झाला. मार्गात रर्थाच्या मागे प्रसाद, पर्यावरण पूरक थैली व विविध वृक्षांच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
एका बाजूला पुरुष भाविक तर दुसऱ्या बाजूला महिला भाविकांनी रथ ओढला. रथ ओढण्याचे नियोजन पाथरवट समाजाच्या कार्यकर्त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV